Red Spinning Frozen Snowflake

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना विन्रम अभिवादन

अण्णा भाऊ साठे  व लोकमान्य  टिळक यांना विन्रम  अभिवादन  

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या  मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.




(१ ऑगस्ट) लोकमान्य टिळक पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतानाच देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडलेल्या महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळक यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून संबोधले होते. मात्र त्यांचे बालपण खडतर गेले होते.
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढय़ांपासून चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पुण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्लो-व्हर्नाक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा पण स्वर्गवास झाला. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वत: अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले.

>> शेंगांची गोष्ट
ते शाळेत असतानाची एक घटना प्रसिद्ध आहे. एकदा वर्गात शिक्षक नसताना काही मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गातच टाकली होती. कचरा पाहून शिक्षक रागावले आणि कचरा करणा-यांची नावे विचारली. पण जेव्हा कुणीच स्वत:हून पुढे आले नाही, तेव्हा त्यांनी सर्व मुलांना टरफले उचलायला सांगितले. पण टिळकांनी टरफले उचलायला नकार दिला. ते म्हणाले, ‘‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’’ तसेच शिक्षकांनी त्यांना कचरा करणा-या मुलाचे नाव विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

>> कसरतीचे महत्त्व
१८७२ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृष होते. त्यांच्या पत्नी तापीबाई त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यांनी नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौका चालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षात त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यात झाला.

>> कॉलेज जीवन
डेक्कन कॉलेजमध्ये असताना त्यांना अनेक मान्यवर शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्स्वर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रुची वाढवली तर गणित शिकवणा-या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकीवरील पुस्तके तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते. १८७७ मध्ये गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बीए झाले. बीएची पदवी मिळाल्यावर त्यांनी एलएल.बी. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रूची आणि संशोधनाची आवड पाहता एलएल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘ज्याअर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल.’’

**********************************************************