Red Spinning Frozen Snowflake

गुरुवार, १३ मे, २०२१

महात्मा बसवेश्वर

 


महात्मा बसवेश्वर यांचा जन्म ११०५ मध्ये बागेवाडी (जि. विजापूर) कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला.महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते.समाजाची अवनती होते, ती धर्मामुळे नव्हे तर धर्मतत्त्वांचे योग्यरीतीने पालन न केल्याने, हे महात्मा बसवेश्वर जाणले होते.  गुरुकुलात ज्ञानी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण घेतले होते. विविध ग्रंथांचा, ज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी संस्कृत ग्रंथातील धर्मतत्त्वे कन्नडमधून लिहिली. बसवण्णांपूर्वी कन्नड वाङ्‌मय फक्त पद्यस्वरूपात लिहिले गेले होते. बसवण्णांनी गद्यातून वचने लिहिण्यास सुरुवात केली, त्यामुळे कन्नड भाषेतील गद्य वाङ्‌मयाचा विकास झाला. कित्येक शिवशरणांनी म्हणजे शैवसंतांनी बसवण्णांचे अनुकरण केले. या वचनांचा लोकांमध्ये प्रचार झाला. वचनांच्या माध्यमातून समाजाच्या निरनिराळ्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला. समाजाची नैतिक व धार्मिकदृष्ट्या रचना कशी असावी, हे सांगण्यात आले. प्रत्येकाने आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करतानाच प्रामाणिक व आध्यात्मिक जीवन जगायला मार्गदर्शक ठरतील अशी तत्त्वे बसवेश्वरांनी समाजाला दिली.आजच्या कोरोनाकाळात गोरगरिब जनतेची लुट होत आहे.याकरिता महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा अवलंब जरुर करावा.

                       महात्मा बसवेश्वरांनी जातीपातीच्या भिंती तोडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती त्यांनी शोषणाविरुद्ध , जातिभेदाविरुद्ध श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई यशस्वीपणे पार पाडली.या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे  ऐक्य होय, हे तत्त्व बसवण्णा जाणून होते.    बसवेश्वरांची विद्वत्ता पाहून गुरू जातवेदमुनींनी त्यांना ज्ञानप्रसाराच्या कार्यासाठी आणि वीरशैव धर्माच्या प्रचारासाठी दक्षिणेतील कलचुरी या ठिकाणी पाठविले. बसवेश्वरांनी या काळात अनेक लोकोपयोगी कामे केली. अनेक अनिष्ट चालीरीती बंद केल्या. बालविवाहाला विरोध करून विधवा विवाहाला मान्यता दिली.    

                    भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी “अनुभव मंडप’ ही  संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते. जातीभेदाला तर थाराही नव्हता.प्रत्येक माणसाला धार्मिक जीवन जगण्याची समान संधी मिळावी. या विद्यापीठाद्वारे बसवेश्वरांनी विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देऊन आत्मोद्धाराचे आणि लोकोद्धाराचे मानवतावादी कार्य केले. या कार्यामुळे बसवेश्वरांना विश्वगुरु, विश्वविभूती, भक्तिभंडारी, क्रांतिकारी, महामानव, वचनकार, महात्मा अशा पदव्या मिळाल्या.इ.स. ११६७ मध्ये श्रावण शुद्ध प्रतिपदेला बसवेश्वरांनी कुडलसंगम येथे समाधी घेतली आणि ते शिवचरणी विलीन झाले. आपल्या वचनांतून त्यांनी सर्व मानवजातीला श्रेष्ठ असा संदेश देऊन मोक्षाचा प्रकाशमार्ग दाखविला आहे.

                                 श्रीम.मंजुषा कमलाकर स्वामी

                                          उस्मानाबाद 


**********************************************************