Red Spinning Frozen Snowflake

शनिवार, १ डिसेंबर, २०१८

रुबेला व गोवर


गोवर आणि रुबेला


लहान मुलांमध्ये येणाऱ्या तापाची अनेक कारणे असू शकतात. सध्या विषाणूजन्य आजाराचे वाढते प्रमाण बघता, जेव्हा पालक ताप हे प्रामुख्याने लक्षण घेऊन बालकांना बालरोगतज्ज्ञांकडे येतात, तेव्हा तापाबरोबर अंगावर पुरळ, लाल चट्टे असे काही आहे का बघितले जाते. ताप आणि त्यानंतर येणारी ‘रॅश’ किंवा पुरळ यामध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात आणि त्यानुसार रोगाचे निदान करता येते. गोवर, रुबेला, स्कारलेट फीवर, इन्फेक्शन मोनोन्यूक्लिओसीस, डेंग्यू, कावासाकी, हॅण्ड फूट माऊथ डिसीज आदी आजारांमध्ये ताप आणि त्याबरोबर येणारे पुरळ बघून त्या आजारांचे निदान करता येते.

गोवर व रुबेला ही याच आजारांपैकी एक असून त्याबाबत जाणून घेऊ या. गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो.


गोवरची प्रमुख लक्षणे – तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे

गोवरमध्ये पुरळ प्रथम कपाळावर, कानामागे, मानेवर येतात. नंतर ते हाता-पायापर्यंत पसरते. रॅश किंवा पुरळ आल्यानंतर हळूहळू तापाचे प्रमाण कमी होते. पुरळ साधारणपणे आठवडय़ानंतर हळूहळू कमी होत जाते. त्वचेवर त्याचे काळपट व्रण काही दिवस राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोकला जाण्यास दोन आठवडे लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये श्वासनलिकेला सूज येऊन बालकांना श्वसनाला त्रास होण्याची शक्यता असते. ताप व तापात येणारे झटके कधीकधी मेंदूच्या आवरणांना सूज येऊन कोमामध्ये जाण्याचा धोका काही बालकांमध्ये दिसून येतो.

उपचार – गोवर हा विषाणूजन्य आजार असल्याने विशिष्ट असे औषध त्यावर नाही. लक्षणांनुसार त्यावर उपचार केले जातात. बाळाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखणे. ज्यांना श्वसनाला त्रास होत आहे, त्यांना ऑक्सिजन किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवणे. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे गोवरच्या आजाराचे स्वरूप तीव्र होऊ शकते. काही परिस्थितीमध्ये बाळ दगावण्याचीही शक्यता असते. कुपोषित बालकांमध्ये गोवरचे प्रमाण जास्त दिसून येते.

जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा – सहा महिने ते एक वर्ष वयाच्या बालकांमध्ये एक लाख आययू (इंटरनॅशनल युनिट), तर एक वर्षांवरील बालकांमध्ये दोन लाख आययू जीवनसत्त्व ‘अ’चे औषध तोंडावाटे दिले जाते. डोळ्यांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता असणाऱ्या बालकांना हे औषध दुसऱ्या दिवशी व दोन आठवडय़ांनंतर असे परत द्यावे लागते.

प्रतिबंधात्मक लस – गोवर टाळण्यासाठी लसीकरण कार्यक्रमामधून लस दिली जाते. गोवरची पहिली लस नऊ ते १२ महिने आणि दुसरी लस १६ ते १८ महिने या वयोगटांत देण्यात येते. पहिल्या लसनंतर साधारणपणे ८५ टक्के प्रतिकारशक्ती मिळते, तर दुसऱ्या लसनंतर ९५ टक्के प्रतिकारशक्ती मिळते.


लोकसत्ता टीम | Updated: October 16, 2018 2:45 am

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

**********************************************************